Shri Sadguru Satam Maharaj
होम

चमत्काराच्या घटना सांगण्याआधी चमत्कार म्हणजे काय हे आधी समजूया. चमत्कार म्हणजे जादू-टोणा किंवा विनाकारण घडणाऱ्या घटना नव्हे. चमत्कार म्हणजे माणसासाठी असलेले प्रेम जे सर्वांना परमार्थाकडे घेऊन जाते. खालील दिलेल्या चमत्काराच्या घटना वाचून तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक चमत्कार हा एखाद्या चांगल्या गुणाला किंवा वाईट गोष्टीला किंवा कमतरतेला दाखवून देण्याकरीता घडविला गेला. ह्यामुळे लोकांना देव असल्याची जाणीव होऊन ते परमार्थाच्या मार्गाकडे वळू शकतील. माणूस जेव्हा सत्याच्या आधारे जीवन व्यतीत करतो आणि भक्तीच्या मार्गाला लागतो, तेव्हा त्यालाही चमत्कार घडल्याचे दिसून येते. आपले सर्व लक्ष जेव्हा सत्य व प्रेमाकडे वळेल तेव्हा हे चमत्कार आपल्याला आकर्षित करणार नाहीत.


  1. चमत्कार ज्यातून दिसतो महाराजांचा तुमच्या देवभक्तीला पाठींबा

    डॉक्टर दाजी मातोंडकर भगवान शंकराचे मोठे भक्त. त्यांचा साधु पुरूषांवर किंवा गुरूवर विश्र्वास नव्हता. पण मित्रांच्या म्हणण्यावर एकदा ते सहज श्री साटम महाराजांना भेटायला गेले. ते ज्यावेळी महाराजांना नमस्कार करायला वाकले त्यावेळी महाराजांच्या तोंडून त्यांना ॐ नम: शिवाय हे ऐकू आले. त्यांना आश्र्चर्य वाटले की, न सांगता महाराजांना त्यांच्या शंकर भक्तीचे कसे कळले. श्री महाराज त्यांना म्हणाले की, त्याला शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. त्यांनी एक जळता लाकडाचा तुकडा फेकला व त्यावर त्याला बसायला सांगितले. न बिचकता, दाजी त्यावर बसले पण आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे दाजी त्यावर बसल्याक्षणी ती आग विझली. दाजींना वाटले जणू ते गंगाजळावर बसले आहेत. श्री महाराजांनी एक कोळशाचा तुकडा दाजींकडे फेकला, ज्यांनी तो एका कापडात धरला. श्री महाराजांनी तो शंकर भगवानांचा प्रसाद आहे आणि घरी गेल्यावरच तो उघड असे दाजींना सांगितले. दाजींनी सांगितल्याप्रमाणे घरी गेल्यावर देवासमोर तो कपडा उघडला. तो कोळसा नसून शिवलींग आहे हे पाहून दाजींना आनंद आणि आश्र्चर्य वाटले. अशा रितीने श्री महाराजांनी दाजींची शंकरावरील भक्तीला पाठींबा देऊन ती वाढवली.

  2. चमत्कार नास्तिकांसाठी

    रत्नागिरीतील काही व्यक्तींना साधुपुरूषांवर किंवा त्यांच्या चमत्कारांवर विश्र्वास नव्हता. ह्या लोकांच्या ऐकण्यात श्री महाराजांचे चमत्कार आले होते. पण ते चमत्कार म्हणजे लोकांना फसविण्याकरीता केलेल्या गोष्टी असे वाटत होते. श्री साटम महाराजांचा खोटेपणा उघडकीस आणण्याच्या हेतूने ते दाणोलीला आले. त्याच दिवशी योगायोगाने दाजी मातोंडकर पण तिकडे आले होते. दाजी मातोंडकरांचा किस्सा स्वत:च्या डोळ्यांनी पाहून ह्या सर्वजणांना वाईट वाटले की त्यांच्या मनात श्री साटम महाराजांबद्दल चुकीची समजूत होती. त्यांना श्री साटम महाराजांच्या खरेपणाबद्दल आणि त्यांच्या दिव्यशक्तीबद्दल विश्र्वास आणखी वाढला. जेव्हा महाराजांनी एका जुन्या पडील घराला केवळ आपल्या नजरेने भस्म केले. ह्या लोकांनी महाराजांची भेट घेऊन त्यांची क्षमा मागितली. त्यांच्या चुकीला माफ करून महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिला. ते सर्वजण श्री साटम महाराजांचे भक्त झाले.

  3. चमत्कार, ज्यातून दिसले की आजूबाजूच्या सर्व दु:खाची जाणीव महाराजांना आहे

    एक दिवशी अचानक रस्त्यावर श्री साटम महाराजांनी एका मुसलमान बाईचा हात धरला व तिला मारायला लागले. मारता मारता ते सारखे म्हणत होते की, मी तुला सोडणार नाही. हा प्रकार बघून आजूबाजूच्या लोकांना वाटले की, श्री महाराजांना वेड लागले आहे. त्यांना वाटले की महाराजांना धडा शिकवायची ही चांगली संधी आहे. त्यांनी त्या बाईच्या मुलाला महाराजांची पोलिसात तक्रार करायला सांगितली. तक्रार करायला तो मुलगा आधी घाबरला. पण लोकांनी जोर धरला आणि शेवटी त्या मुलाने तक्रार नोंदवली. पोलिसांनी श्री महाराजांना अटक केली. महाराजांच्या भक्तांना काय करावे कळेना, ते काळजीत पडले. अप्पा सबनीस एका शाळेतले मास्तर होते. ते महाराजांचे भक्त होते, त्यांनी महाराजांची जामीनावर सुटका करून घेतली. त्या बाईचा नवरा तिच्या बरोबर रहात नव्हता. त्याला क्षयरोग झाला होता व तो मृत्युच्या दारात होता. ह्या मारण्याच्या प्रकरणाच्या सुमारास त्याच्या स्वप्नात एक फकीर आला. तो सारखा म्हणत होता मी तुला सोडणार नाही, तुझ्या बायकोला कोणीतरी मारत आहे. घाबरून तो माणूस उठला आणि पाणी मागितले. पाणी प्यायल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्याचा रोग बरा झाला आहे. त्याने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. तीने ते स्वप्न आणि खरोखर घडलेल्या तीला मारण्याच्या प्रकरणाची हकीकत नवऱ्याला सांगितली. त्या दोघांनाही पटले की महाराजांनी तिच्या नवऱ्याचा क्षयरोग बरा केला. त्यांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व त्यांची माफी मागितली. महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिला. ते दोघेही महाराजांचे भक्त झाले. ह्या चमत्कारावरून लक्षात येते की, महाराजांना सर्व लोकांच्या सर्व दु:खांची जाणीव आहे.

  4. चमत्कार ज्यातून दिसते की महाराज कधी आपल्या भक्ताला निराश नाही करत

    एका म्हाताऱ्या बाईची महाराजांवर निस्सीम भक्ती होती. त्यांना नैवेद्य दाखविल्याशिवाय ती कधीही जेवत नसे. ऐके दिवशी महाराजांना आपल्या हातांनी बनविलेली मटण चपाती खायला घालायची ईच्छा झाली. तीने दोन माणसांना पुरेल इतके जेवण बनवून महाराजांकडे नेले. तिथे गेल्यावर तिली दिसले की, महाराजांबरोबर पंधरा माणसे बसली आहेत. महाराजांनी सर्वांना सांगितले की, त्या म्हाताऱ्या बाईने आणलेली मटण चपाती सर्वजण जेवणार. बाळू नावाच्या त्यांच्या सेवकाला आश्र्चर्य वाटले व तो चिंतेत पडला की दोन माणसांचे जेवण पंधरा माणसांना कसे वाढायचे. त्याला काही कळेना. पण धीर करून त्याने महाराजांना ही गोष्ट सांगितली. महाराजांनी त्यांनी स्वत:ला आधी वाढयला सांगितले व नंतर इतरांना वाढायला सांगितले. हे एकून बाळूला आणखी चिंता वाटली पण वाढण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्या बाईने स्वत:च्या हाताने महाराजांना आधी वाढले. महाराजांनी बाळूला इतरांना वाढायला सांगितले. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वांना वाढूनसुद्धा जेवण संपत नव्हते. सर्वजण पोटभर जेवले आणि नंतर तरी ही थोडे जेवण उरले. ह्यातून कळते की महाराज आपल्या भक्तांना कधीही निराश करीत नाही.

  5. चमत्कार ज्यामधून कळते की महाराजांकडे अहंकाराला महत्त्व नाही

    कला महर्षी बाबुराव कोल्हापूरचे गाजलेले छायाचित्रकार. एक दिवशी ते आणि सावंतवाडीचे बापूसाहेब सरकार महाराजांना भेटायला गेले. बाबुरावांना महाराजांचे छायाचित्र घ्यायची इच्छा होती व तसे त्यांनी बापूसाहेबांना सांगितले. बापूसाहेबांना महाराजांना विचारायला संकोच वाटत होता. थोड्यावेळाने महाराजांची मन:स्थिती बघून बापूसाहेबांनी महाराजांनी फोटो घेण्याबद्दल विचारले. महाराजांनी अनुमती दिली पण म्हणाले की फक्त बाहेरच्या शरीराचे फोटो घेऊन उपयोग नाही, जर अंतर्मन अशुद्ध असेल. महाराजांना माहित होते की, बाबुरावांना आपल्या कलेचा अतिशय अहंकार होता आणि महाराजांचा फोटो घेण्यामागचा त्यांचा हेतू केवळ पैसे कमविण्याचा होता. बाबुरावांना अनुमती मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी साधारण 18 फोटो घेतले. वेगवेगळ्या आसनांमध्ये आणि अहंभावात हसत निघून गेले. पण त्यांना निराशा झाली जेव्हा त्यांनी पाहिले की रिळ धुतल्यावर सर्व फोटो कोरे होते. ह्यामागचे कारण असे की, ते फोटो महाराजांच्या इच्छेविरूद्ध घेतले होते. कारण महाराजांना बाबुरावांचा फोटो घेण्यामागचा खरा हेतू माहिती होता. जर बाबुरावांनी महाराजांना आधीच आपल्या मनातील गोष्ट सांगितली असती तर त्यांना कदाचित यश मिळाले असते. ह्यावरून लक्षात येते की महाराजांपाशी खोटेपणा आणि अहंकार चालत नाही.

  6. चमत्कार जो सिद्ध करतो की, महाराज जातपात न बघता सर्वांची मदत करत

    एका मुसलमान बाईला पोटाचे खूप दुखणे होते. ते दुखणे अतिशय असह्य होते, इतके की कधी कधी तिला जीव द्यावासा वाटे. औषधोपचाराने देखील ते दुखणे बरे होत नव्हते. तिच्या भावाने तिची ही अवस्था पाहिली आणि शेवटचा मार्ग म्हणून देवाकडे धाव घ्यावी असे त्याने सुचविले. तिला अजमेरच्या दर्ग्यात घेऊन जाण्याचा सल्ला त्याने आपल्या मेहुण्याला दिला. अशिया खंडातील हा सर्वात मोठा दर्गा, जिथे इच्छा नक्की पूर्ण होतात असे प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे ते सर्व अजमेरला गेले. ३ दिवस राहून दानधर्म व पूजाअर्चा केली. एके दिवशी स्वप्नात त्यांना दाणोलीला जाऊन श्री साटम महाराजांना भेटायला सांगितले. त्यांच्या येण्याआगोदरच महाराजांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना सांगितले की, अजमेरहून काही माणसे येणार आहेत. महाराजांनी एका बाटलीत पेट्रोल तयार ठेवायला सांगितले. ती बाई आणि तिचा नवरा दाणोलीला पोहोचले व त्यांनी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा आशिर्वाद मागितला. त्याक्षणी महाराजांनी त्या बाईचे तोंड उघडले व त्यात ती पेट्रोलची बाटली ओतली. हे पाहून तिचा नवरा व इतर उपस्थित लोक थक्क झाले. काही क्षणांकरीता ती बाई बेशुद्ध पडली, पण शुद्धीवर येताच तिच्या लक्षात आले की, तिचे पोटाचे दुखणे पूर्णपणे बरे झाले होते. त्या नवरा बायकोने कृतज्ञतेने महाराजांचे पाय धरले आणि त्यांचे भक्त झाले.


पुढे

वर