Shri Sadguru Satam Maharaj
होम
  1. चमत्कार ज्यातून दिसून येते की, श्री साटम महाराजांची असंभव गोष्ट संभव करण्याची शक्ती

    एकदा महाराज आपल्या काही भक्तांबरोबर गाडीतून जात होते. अचानक गाडी एका दरीत पडली, पण एक चमत्कार म्हणावा की कोणालाही इजा झाली नाही. पण सगळीकडे शोधले तरी महाराज कुठेही दिसत नव्हते, हे पाहून त्यांचे भक्त चिंतेत पडले. काही वेळाने समोरच्या दिशेने एक गाडी आली आणि तेथे थांबली. सर्वांना आश्र्चर्य वाटले जेव्हा त्यांनी महाराजांना त्या गाडीत आरामात बसलेले पाहीले. कोणतीही सफाई न देता सर्वांना विचारात पाडणारी ही अद्भूत घटना आहे.

  2. चमत्कार जे दाखवून देते की, भक्तीमध्ये धीर राखणे हे अतिशय महत्त्वाचे आहे

    शिर्सेकर व त्यांची बायको अतिशय गरीब होते. त्यांची हाता तोंडाची गाठ होती. त्यांना कुठून तरी श्री साटम महाराजांबद्दल कळले. आपल्याला महाराज काहीतरी मदत करतील ह्या आशेने ते दाणोलीला आले. पण आठ दिवसांनंतरही त्यांना महाराजांना भेटता आले नाही. आशा न सोडता ते तिथेच थांबून राहिले. छोटी मोठी कामे करत स्वत:चे जीवन जगत राहीले. बरेच दिवस धीर धरून वाट पाहिल्यानंतर त्यांना महाराज भेटले एका किराणाच्या दुकानात. त्यांनी महाराजांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. काही न बोलता महाराजांनी फक्त एक मूठ तांदुळ त्यांच्या हातात दिले व त्यांना जायला सांगितले. मूठभर तांदुळाचा प्रसाद मिळाल्याबद्दल शिर्सेकर जोडप्याला आनंद झाला. पण पैशाच्या अडचणी आणि भविष्याच्या अनिश्चिततेची काळजी त्यांना डाचतच होती. ह्या विचारात चालत जात असताना एका गृहस्थाने जो त्यांचा जवळचा मित्र होता त्यांना हाक दिली. त्यांच्या बोलण्यातून शिर्सेकरांच्या अधिक चिंतेबाबत त्या मित्राला कळले. त्याने श्री शिर्सेकरांना नोकरी दिली. तो मित्र तांदुळ आयात करुन भारतात विकायचा धंदा करत होता. त्याला कोणीतरी मदतनीस पाहिजे होता. शिर्सेकरांनी त्याचा नोकरीचा प्रस्ताव स्वीकारला व मुंबईला आले. शिर्सेकर नोकरीला लागल्यावर त्या मित्राचा धंदा वाढू लागला, इतका की शिर्सेकरांना रंगूनला तिकडचा धंदा सांभाळण्यासाठी पाठविले. काही दिवसांनी शिर्सेकरांनी मित्राच्या अनुमतीने स्वत:च तांदुळ आयातीचा धंदा सुरू केला. ऐकेकाळी ज्यांना एक एक पैशाकरीता झगडायला लागायचे, तेच शिर्सेकर आता लखपती झाले होते. हे सर्व केवळ श्री साटम महाराजांच्या आशिर्वादाने. श्री. व सौ. शिर्सेकर महाराजांचे असिम भक्त झाले व आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्सेकरांनी महाराजांना सोन्याच्या पादुका अर्पण केल्या.

  3. चमत्कार हे सिद्ध करण्यासाठी की सामान्य शक्ती दैविक शक्तीपुढे काही नाही

    एक दिवशी सावंतवाडीचे बापूसाहेब सरकार गाडीने दाणोलीला जात असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक एक नागडा माणूस आला. बापूसाहेबांनी गाडी थांबविली तेव्हा त्यांना एक अस्वच्छ अर्धवट कपडे घातलेला, एका हातात लाकडाची काठी आणि दुसऱ्या हातात नारळाची करवंटी घेतलेला माणूस गाडीसमोर दिसला. त्याकाळात एखाद्या राजाची गाडी थांबविणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे होते. पण काही कारणाने बापूसाहेब अजिबात अस्वस्थ नव्हते. ते फक्त त्या माणसाकडे बघत राहीले. गाडी थांबल्याबरोबर तो वेडा माणूस बाजुला झाला. बापूसाहेबांनी गाडी सुरू केली पण पुन्हा तो वेडा माणूस गाडीच्या समोर आला. आजुबाजूला जमलेली लोक हा सगळा प्रकार गुपचूप पहात उभे होते. त्यांच्यात हिंमत नव्हती की त्या वेड्या माणसाला तरी थांबवतील किंवा बापूसाहेबांशी बोलतील. बापूसाहेबांनी आपल्या सहाय्यकाला त्या माणसाबद्दल चौकशी करायला सांगितली. परंतु त्या माणसाबद्दल जास्त काही कळले नाही. त्यामुळे हा कोणीतरी वेडा आहे असे त्यांना वाटले. बापूसाहेबांनी गाडी पुन्हा सुरू केली पण पुन्हा तो माणूस गाडीसमोर आला. परंतु ह्यावेळी त्यांने बापूसाहेबांना सावंतवाडीला परत जाण्यास सांगितले. कारण ज्या कामासाठी बापूसाहेब दिल्लीला जात होते ते काम झालेले होते आणि दिल्लीला जाण्याची आवश्यकता नव्हती. हा सल्ला ऐकुन बापूसाहेबांचा विचार बदलला आणि त्यांनी गाडी सावंतवाडीच्या दिशेने वळविली. सावंतवाडीच्या त्यांच्या महालात पोहोचताच त्यांना होकार मिळाल्याची कागदपत्रे मिळाली. खरोखरच त्यांना दिल्लीला जाण्याची आवश्यकता नव्हती. बापूसाहेबांना त्या वेड्या माणसाच्या अंर्तज्ञानाच्या शक्तीचे आश्र्चर्य वाटले. परंतु तो वेडा माणूस दुसरा कोणी नसून श्री साटम महाराज होते. ह्या घटनेनंतर बापूसाहेब महाराजांचे भक्त झाले आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय महाराजांच्या सल्ल्यानेच ते करू लागले.

  4. चमत्कार अंधश्रद्धाळूंसाठी

    एक दिवशी श्री साटम महाराज आपल्या खोलीत झोपले असताना त्यांच्या खोलीबाहेर काही भक्त जमले. त्यात एक गृहस्थ होता जो पहिल्यांदाच तिथे आलाल होता. त्याला श्री महाराजांच्या खऱ्या रुपाची शंका होती. कारण त्याच्या ऐकण्यात आले होते की, महाराज दारू देखील पितात. त्याने ही शंका त्याच्या मित्रांना बोलून दाखविली होती. त्यांनी त्याला सावध केले की असे काही त्याने बोलू नये. थोड्यावेळाने महाराज उठले आणि रागात खोलीबाहेर आले. त्यांनी आपल्या अंगावर घातलेली वस्त्रे सुद्धा काढून टाकली. ते जोरात बोलले कोणी म्हटले की मी देव आहे, कोणी म्हटले की मी साधुपुरूष आहे. मी दारू पितो, मी मांस मच्छी खातो. देव हा देवळात आहे, देव इथे नाही. तुम्ही सर्वांनी इथून जा. ते नंतर रस्त्यावर शिव्या देत आले आणि एका सोनाराच्या दुकानात शिरले व म्हणाले मी साधूपुरूष कसा असू शकतो. मी मच्छी खातो. दारू पितो वगैरे वगैरे. त्यानंतर त्यांनी एक बाटली भरून तेजाब तोंडात ओतले. लोकांना वाटले की तेजाब पिऊन महाराज मरून जातील पण महाराज शांत झाले त्यांच्या शरीरावर काहीही परिणाम न होता. खरे तर त्यांना राग आलाच नव्हता पण काही लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. ज्या लोकांनी महाराजांची थट्टा केली होती त्यांना महाराजांच्या शक्तीची जाणीव झाली व आपल्या अविचारी वृत्तीची लाज वाटली. श्री साटम महाराज दारू पिण्याच्या किंवा मांस मच्छी खाण्याच्या विरूद्ध नाही. ते आवड म्हणून खात पीत नव्हते. शारीरिक गरजांच्या पलिकडे महाराज पोहोचले होते आणि ज्यांना ही गोष्ट माहित नाही तीच माणसे महाराजांची थट्टा करू शकत होते.

  5. चमत्कार पशु पक्षांबद्दल प्रेम दर्शविण्यासाठी

    एक दिवशी जंगलात एकटे बसून ध्यान करत असताना एका वाघाने महाराजांवर झेप घेतली व त्यांचा खांदा घायाळ केला. महाराजांच्या लक्षात आले की, तो वाघ फक्त त्यांचे ध्यान आपल्याकडे आकर्षित करीत आहे. जणू महाराजांचे दर्शन घेण्यासारखे. महाराजांनी फक्त त्या वाघाकडे बघितले आणि तो वाघ तिथून निघून गेला. महाराजांनी घावाकडे लक्ष दिले नाही. ते जवळच्या एका किराणा दुकानात गेले व तेथे गूळ मागितला. त्या दुकानदाराला म्हणाले की गूळ त्यांना जखमेवरच्या किड्यांसाठी पाहिजे. दुकानदार आश्र्चर्यचकित होऊन महाराजांकडे बघत राहिला. काहीही न करता ती जखम लवकरच बरी झाली.

  6. चमत्कार माणसांवरचे प्रेम दर्शविण्यासाठी

    दाणोली गावात श्री साटम महाराज येण्यापूर्वी पाण्याचा तुटवडा होता. नागझरी नावाची एकच विहीर होती परंतु ती सुद्धा आटत आली होती. दाणोलीला आल्यानंतर श्री साटम महाराजांनी पाण्याच्या कमतरतेमुळे लोकांचे हाल होतांना पाहिले. ते सहन न झाल्यामुळे ते नागझरी विहीरीजवळ उभे राहिले आणि ते उभे राहिल्याक्षणी नागझरीत पाण्याचा सतत प्रवाह सुरू झाला. जो आजही सुरू आहे आणि दिवसभरात कधीही थांबत नाही. अशाप्रकारे महाराज दाणोलीच्या लोकांच्या मदतीस त्यांच्यावरील प्रेमामुळे आणि करुणेमुळे आले.


मागे
पुढे

वर