Shri Sadguru Satam Maharaj
होम

महाराजांचे प. पु. गुरू अब्दुल रेहमान शाहबाबांचा परिचय
अब्दुल रेहमान बाबा हे मुळचे बगदादचे. बाबांचे वडिल हजरत शमशोद्दीन कादरी हे भारतात मद्रास येथील सेलम जिल्ह्यात सन्नूर येथे स्थायिक झाले. बाबांचा जन्म व धार्मिक शिक्षण येथेच झाले. नंतर बाबा कुराणांचे पाठांतर करुन हाफिझ झाले. त्यानंतर बाबांनी मुंबईत येऊन जांबळी मोहल्ला (बापू खोटे स्ट्रीट) पायधुनी येथील मशिदीत मुक्काम केला. त्या दरम्यान त्यांनी मक्का मदिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रा करुन ते हाजी झाले. याच प्रवासात त्यांची भेट सुफी पंथाचे मिर्झा सिनीया यांच्याशी झाली. त्यांनी बाबांना सुफी व सिंद्धी यांच्यात मेळ घालून एक दिलाने राहण्याची कला शिकवली. त्यांनीच बाबांना शिवलींग दिले. ते शिवलींग बाबांसोबत शेवटपर्यंत होते.

रेहमान बाबांचा प्रवास
मिर्झा सिनीया व बाबा हज यात्रा करून परत येतांना बाबांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ भेटले. त्यांनी आपल्या तेजस्वी नजरेतून तेज बाबांच्या नजरेत सोडले. त्यानंतर मिर्झा सिनीया यांना दृष्टांत देऊन स्वामी समर्थांनी अक्कलकोटला बोलावून घेतले. बाबांना त्यांनी श्री अक्कलकोट निवासी श्री दत्तस्वरूपाय नम: हा मंत्र दिला व आपले अवतार कार्य सुरू करण्यास सांगितले. अक्कलकोटहून तडक मुंबईला येताच ते मशिदीतून बाहेर पडले. हातात काठी व लोखंडी गोळा घेऊन भेंडी बाजार व डोंगरीच्या परिसरात कार्य करण्यासाठी फिरु लागले. दाढी वाढलेली, कधी अंगभर वस्त्र तर कधी अर्ध नग्न, कधी दिगंरावस्थेतील बाबांना बघून प्रथम लोक घाबरून लांब राहत. परंतु जस जसे त्यांचे चमत्कार लोकांनी पाहिले त्यांच्या भक्तांची संख्या वाढू लागली. कोणाला काही अपेक्षा असल्यास बाबा त्याला हातातील दांडा उचलून मारायचे. मग त्या भक्तांची इच्छा पूर्ण होई. विशेषत: रुग्णांचा आजार बरा होई. अशाप्रकारे बाबांची किर्ती दशदिशांना पसरली.




अब्दुल रेहमान शाहबाबा

गुरु शिष्यांची भेट
त्या दरम्यान चर्चगेटजवळ पारश्यांच्या विहीरीवर श्री साटम महाराज बसले असतांना त्यांची बाबा रेहमान यांच्याशी भेट झाली. तेव्हा बाब महाराजांना म्हणाले जो प्रकाश मे बापने मुझे दिखाया, वो मुझे दिखाने के लिए मुझे इधर मेरे बापने भेजा है. असे बोलून त्यांना आपल्यातील ईश्र्वरी तेज महाराजांच्या शरीरात सोडले त्यानंतर महाराज डोंगरीला बाबांच्या दर्शनास जात असत. सध्या असलेल्या डोंगरी पोलीस ठाणे येथील टेकडीवर पूर्वी बाबांची बैठक होई त्या बैठकीलाही महाराज जात असत. कधी कधी आपल्या लाडक्या शिष्याच्या भेटीला बाबा जात असत. बाबांकडून अनुग्रह घेतल्यानंतर महाराजांनी तपश्चर्येसाठी पूर्ण भारत देशभर भ्रमंती सुरू केली. त्यानंतर आपले कार्य सुरू केले ते करत करत ते दाणोलीला स्थायिक झाले. अशाच एके दिवशी दाणोलीत साटम महाराज खूप रडू लागले. भक्तांनी रडण्याचे कारण विचारले असतांना ते म्हणाले आज माझा गुरू गेला. त्यानंतर थोड्याच वेळात रेहमान बाबांनी देह सोडल्याची खबर मुंबईहून तेथे पोहोचली. २७ डिसेंबर १९१६ रोजी त्यांनी देह सोडला. त्यांचे वय अंदाजे १२५ वर्षांचे होते.

बाबांची दर्गाह (तांडेल स्ट्रिट, छत्री सारंग मोहल्ला, डोंगरी) व बैठक (डोंगरी पोलीस ठाणे)
बाबांच्या इच्छेप्रमाणे छत्री सारंग मोहल्ला (जिथे बाबा नेहमी बसत असत) तेथे त्यांची कबर केली व तिथेच त्यांना दफन केले. त्यानंतर तिथे त्यांचा दर्गा उभारण्यात आला. सध्या असलेल्याडोंगरी पोलीस ठाण्याच्या बाजूला टेकडी होती. बाबा त्या टेकडीवरच्या झाडाखाली एका शिळेवर बसायचे व नमाज पडायचे. त्यांनी देह सोडल्यानंतर १९२३ साली डोंगरी पोलीस ठाणे वाढविण्यासाठी टेकडी फोडण्याचे काम सुरू झाले. सर्व टेकडी फुटली पण बाबा बसायचे ती जागा फुटत नव्हती म्हणून अनेक सुरूंग लावले. तरीही ती शिळा न फुटता त्यातून रक्त येऊ लागले. ते रक्त तपासणीसाठी पाठवले असता ते मानवी रक्त असल्याचे निदर्शनास आले. ज्यावेळी पोलीस आयुक्तांनी बाबांच्या दर्ग्यावर जाऊन क्षमा मागितली तेव्हा ते रक्त येणे थांबले. त्याच्या खुणा अजूनही तशाच आहेत. त्यानंतर तेथे भिंत बांधून ते ठिकाण पवित्र स्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

दर्ग्याला उर्दु तारीख १ जमादिन अव्वल रोजी दरवर्षी १० दिवस बाबांचा उरुस (जत्रा) भरते. या दिवसांत सतत संदल मिरवणूका निघतात. पाचव्या दिवशी डोंगरी पोलीस ठाणे येथील बाबांच्या बैठकीला संदल मिरवणूकीचा मान आहे. त्यावेळी कव्वाली कार्यक्रम होतात. दहाव्या दिवशी समारोप कार्यक्रम होतो. बाबांचा भंडारा (नियाज) गोरगरीब व भक्तांना वाटप केला जातो. बाबांच्या भक्तांमध्ये मुस्लिम तसेच हिंदूही भक्त बरेच होते व अजूनही आहेत. बाबा देहरूपाने असताना जितके चमत्कार त्यांनी दाखविले तितकेच चमत्कार त्यांनी देह सोडल्यानंतरही घडत आहेत. बाबांची कृपादृष्टीही भक्तांना लाभत आहे व निरंतर ती लाभत राहील.

चमत्कार
  • एका मुलाला डोक्यात बऱ्याच फोड्या झाल्या होत्या. काही उपाय चालले नाहीत तेव्हा बाबांनी त्यांच्या डोक्यात दांडा मारला, मुलगा रक्तबंबाळ झाला. काही दिवसांत तो काही उपचार न करता चांगला झाला.
  • एका १० वर्षाच्या मुलाचा ताप काही केल्या उतरत नव्हता, त्याला बाबांनी केळी खायला दिली व थोड्याच वेळाने त्याचा ताप उतरला.
  • एक इसम समुद्रात जहाजावर कामावर जायचे म्हणून बाबांचा आशिर्वाद घ्यायला आला. बाबा त्याला कामाला जाऊ नकोस असे म्हणाले, तो कामावर गेला नाही. त्यानंतर १५ दिवसांनी तेच जहाज व जहाजावरील लोक समुद्रात बुडून बेपत्ता असल्याची खबर आली.
  • बाबांच्या दर्ग्याचे ट्रस्टी मिया शेट महंमद छोटानी हे बाबांनी देह सोडल्यानंतर लंडनला गेले होते. परत येतांना त्यांना अचानक बोलताच येईना. १ महिन्यापर्यंत त्यांचे तोंड बंद होते. त्यांच्या एका शत्रूने कब्रस्तानात एक बकऱ्याचे कापलेले मुंडके पुरलेले होते म्हणून ते बोलू शकत नव्हते. बाबा रेहमान यांनी पीर ईब्राहीम यांच्या स्वप्नात येऊन हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर ते मुंडके बाहेर काढले आणि ताबडतोब छोटानी बोलू लागले.
  • एकदा एका इसमाच्या तक्रारीमुळे बाबांना कैद केले त्यावेळी बाबा कोठडीला कुलूप असताना बाहेर यायचे.
  • एकदा बाबा फिरत असताना एका गरीब महिलेकडे त्यांनी चहा मागितला तिने त्यांना चहा दिला तेव्हा बाबांनी चहा घेतला व बाजूच्या शेगडीतून दोन कोळसे त्या कपात टाकले व तिला देऊन निघून गेले. नंतर तिने पाहिले तेव्हा त्या कोळशाचे सोने झाले होते.
  • एका इसमाचा फुले विकण्याचा धंदा चालत नव्हता. भाड्याच्या घरात तो राहत असे. खोलीचे भाडे थकलेले होते. तो बाबांकडे आला तेव्हा बाबांनी त्याला संध्याकाळपर्यंत थांबण्यास सांगितले. संध्याकाळी एका व्यक्तीने त्या इसमास पैशाची पिशवी दिली. तिच्यात जेवढे भाडे थकलेले होते तेवढीच रक्कम होती.
  • जहाजाचा एक कॅप्टन बाबांना भेटावयास येई. बाबांच्या जाण्यानंतरही तो दर्ग्याला भेट देई. एका रात्री त्याला दृष्टांत झाला की तू दाणोलीला जा व साटम महाराजांना भेट. तो चौकशी करत दाणोलीला पोहचला व त्याने महाराजांचे डोळे भरून दर्शन केले.
वर